Thursday 4 August 2016

कुठून सुरुवात करू ते कळत नाहीये, पण आता लिहायला घेतलंय तर माझा ह्या ट्रेकचा अनुभव माझ्या शब्दात मांडते.
सह्याद्रीच्या कडे-कपारीत थोडंसं फिरल्यावर हिमालयाचं पण सुंदर रूप जरा जवळून पाहावं असं वाटलं, म्हणून ट्रेक विषयी माहिती गोळा करायला इंटरनेट शोधमोहीम सुरू केली. टिना कांकरिया ह्या मैत्रिणीने "India Hikes" हे नाव सुचवलं. मग त्यांच्या वेबसाइटवर जाऊन वेगवेगळ्या ट्रेक्सची माहिती वाचली आणि ठरवलं की आपल्याला "hampta Pass" हा मनालीपासून सुरू होणारा ट्रेक करायचाय. मग मैत्रिणींना आणि मित्रांना कोणी ट्रेकला यायला इंटरेस्टेड आहे का हे विचारलं, प्रतिसाद तितका चांगला मिळाला नाही. मी निराश होता कोणी आलं नाहीतर एकटीनेच जायचं ठरवलं आणि सहज म्हणून बर्खाला विचारलं. तर ती हो म्हणाली, पण तिच्या Mtech एक्साम मुळे आम्ही June end ची तारीख घ्यायचं ठरवलं. तिच्या सोबत रणजीत आणि चैतन्य हे दोघेही ट्रेकला यायला तयार झाले. अशा प्रकारे आम्ही चार टाळकी हिमालयाच्या कुशीत ट्रेकला निघालो.

25,26 June 2016:  
सकाळी 7.30 चं आमचं विमान होतं. 10.30 च्या दरम्यान दिल्ली एयरपोर्टवर आम्ही ट्रेकच्या बॅग्स मांडून गप्पा मारत आणि दिल्ली एयरपोर्ट फिरत बसलो. चैतन्य पुस्तक वाचत बसला होता, बाकीचे थोड्या वेळाने कंटाळलो. मग बहुमताने दिल्ली एयरपोर्ट मधून बाहेर पडायचं ठरवलं आणि कॅनॉट प्लेसला गेलो. तिथे जाऊन "Paradise" मध्ये चिकन आणि व्हेज बिर्याणीवर ताव मारला. फक्त दुपारचे 2 वाजले होते आणि मनालीसाठी बस तर संध्याकाळी 6 ला होती, अजून 4 तास काय करायचे असा प्रश्न पडला, मग इंडिया गेटला जायचे ठरवले आणि रिक्षा शोध सुरू झाला. लगेच रिक्षा मिळाली आणि इंडिया गेटला आम्ही चौघे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर दिल्लीच्या कडक उन्हामुळे आणि दमट हवामानामुळे अंगाची लाही लाही झाली, घामाच्या धारा निथळत होत्या नुसत्या. शेवटी एका झाडाखाली सावली पाहून आम्ही सगळे तिथे पुढच्या 2 तासासाठी विसावलो. एक छोटीशी खारुताई छान खेळ करत होती, तिला कॅमेरा मध्ये capture केले, तिचा हा फोटो:
खारुताईचा रंजीतने काढलेला फोटो
 संध्याकाळी 5 वाजता तिथून आम्ही आमचा बिस्तारा आवरला आणि मनालीला जाणारी बस पकडली. 16.5 तासाच्या प्रवासा नंतर अखेर आम्ही मनालीला रविवारी सकाळी 10.30 ला पोहोचलो. हॉटेल निहाल कॉटेज थोडंसं दूर होतं पण छान होतं, खोली मधून दिसणारं निसर्ग सौन्दर्य अप्रतिम होतं, मनाला सुखावणारं. सगळ्यांना भूक लागली होती, मग छान पैकी पोटभरीचा नाश्ता करून सगळे निद्राधीन झाले. संध्याकाळी 5 वाजता "नेचर्स पार्क" मध्ये ट्रेकची संक्षिप्त माहिती देण्यात येणार होती. "नेचर्स पार्क" तर सापडलं, पण त्याचं प्रवेशद्वार काही आम्हाला सापडेना. ते शोधत असताना दोन मुलं चौकशी करायला आली- "India Hikes, India hikes "; ते दोघे होते संकेत आणि मेघनाद - पुणे आणि हैद्राबादला राहणारे. अशा प्रकारे 2 ट्रेकर्सशी ओळख झाली. शेवटी ट्रेक लिडला फोन केल्यावर पार्कचं प्रवेशद्वार सापडलं. पार्कमध्ये गेल्यावर ट्रेक लिड "सौम्या मित्र" ची ओळख झाली. 6.2 फूट उंची, सावळा वर्ण, तजेलदार चेहरा आणि उत्साही व्यक्तिमत्व, असा हा आमचा ट्रेकचा म्होरक्या पुढच्या 5 दिवसांसाठी. त्याने ट्रेकची संक्षिप्त माहिती दिली आणि सगळ्यांशी ओळख पण झाली. सौम्याने त्याला "SJ" असा म्हणायला सांगायला, कारण तो बंगाली असल्यामुळे त्याचं नावाचा उच्चार शोमू असा आहे आणि लोक त्याला सौम्या म्हणतात, हे त्याला आवडत नाही. त्याच्या नावाचा चुकीचा उच्चार केलेला त्याला आवडलं नाही, म्हणून त्याने हे शॉर्टकट नाव सुचवलं आणि सगळ्यांना ते पटलं. अशा प्रकारे SJ आमचा ट्रेकचा म्होरक्या झाला आणि त्याच्या सोबत असलेली अजून एक व्यक्ती - तन्मय- "मूर्ती लहान पण कीर्ती महान" एवढंच मी म्हणेल ह्या व्यक्ती विषयी. SJ ने आम्हाला बॅग कशी पॅक करायची ह्याचा प्रात्यक्षिक दाखवलं आणि आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तू तन्मय कडून घेतल्या आणि तिथून बाहेर पडलो. पार्क मधून बाहेर पडताना मन खूप साशंक होतं ट्रेक विषयी. बंगाल, बेंगलोर, दिल्ली, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ट्रेक साठी आलेले लोकं आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे; आपण ह्या लोकांमध्ये सामावून जाऊ कि नाही ही मनात थोडीशी भीती होती. ती दूर झाली कि नाही ते कळेलच तुम्हाला ट्रेकच्या शेवटी ;)

27June 2016: जोब्रा ते ज्वारा: 11363 feet, 4 kms
सकाळी 7 वाजता आम्ही मनालीच्या मॉल रोड जवळच्या वर्तुळापाशी पोहोचलो. भारतीय वेळेनुसार 7.30 पर्यंत सगळे पोहोचले आणि आम्ही टाटा सुमोमध्ये आमचा प्रवास सुरू केला. गाडी मध्ये बसल्यावर राघवेंद्र नाईक आणि ज्योतीशी ओळख झाली. मनालीपासून एका तासाच्या अंतरावर जोब्रा ह्या ठिकाणाहून ट्रेक सुरू होणार होता. जोब्राला जाणारा रस्ता म्हणजे संपूर्ण घाट होता, 40 तीव्र वळणे होती ह्या घाटात आणि प्रत्येक वळणाला क्रमांक दिलेला होता त्यासोबत फूट मध्ये उंची पण. घाटात पूर्ण धुकं होतं, त्यामुळे प्रवास खूपच सुखकर वाटत होता. जोब्राला पोहोचल्यावर सगळ्यांनी चहा पिला कारण थंड वारे वाहत होते आणि सगळ्यांनाच थंडी वाजत होती. मग सगळ्यांनी पुरी-भाजी वर ताव मारला आणि "SJ" च्या बाजूला गोळा झाले. त्याने परत आजच्या दिवसाच्या ट्रेकची माहिती दिली आणि सांगितलं की आज पहिला दिवस थोडा कठीण आहे. कारण एकतर व्यायामाची फार सवय नाही आणि त्यात 9800 फूटपासून चालायला सुरू करायचंय आणि सुमारे 6 तास चालायचं आहे, त्यामुळे थोडा त्रास होणं साहजिक आहे. मी मनाची आधीच तयारी करून घेतली की काही झालं तरी माघार घ्याची नाहीये आपण. मी आणि बरखाने बॅग्स ऑफलोडींग केल्या होत्या, रणजीत आणि चैतन्यने स्वतःच बॅग घ्यायचं ठरवलं. मग आम्ही आमच्या छोट्या बॅग्स आणि कॅमेरा घेऊन चालायला सुरुवात केली.
ट्रेकच्या सुरुवातीच्या भागात छान जंगल होतं- पाईन आणि मॅपलची झाडं. थोडासा चढ, थोडा उतार, मग थोडीशी सपाट जमीन, कडेने वाहणारी सुंदर नदी. नदीचं पाणी इतकं स्वच्छ होतं की बिसलेरी मधलं पण पाणी त्यापुढे अस्वच्छ वाटेल.
छोटासा पूल क्रॉस करताना टीम आणि नितळ स्वच्छ पाणी
 अशा सुंदर वाटेवरून चालताना एकाच गाणं आठवत होतं: "मंजिल से बेहतर लगने लगे है ये रास्ते". अशा प्रकारे आम्ही वाट तुडवत होतो, मध्ये एक बऱ्यापैकी अवघड रॉक पॅच होता चढायला, मला तेव्हा तोरणाचा रॉक पॅच आठवला. तो चढून आल्यावर आम्ही दुपारी एक वाजता जेवणासाठी विश्रांती घेतली आणि सगळ्यांनी आपल्या बॅग्स टाकल्या आणि जेवणाचे डबे उघडले. जेवण म्हणजे हिमालयन मोमोज सारखा एक प्रकार होता आणि त्यासोबत एक तिखट चटणी आणि दोन केळी. अशा प्रकारे जेवण झाल्यावर डबा जवळून वाहणाऱ्या पाण्यातून धुवून घेतला आणि छान थोडा वेळ एका जागी बसले. तेव्हा बाजूलाच स्वतःच्या खाण्यात मग्न असेल खेचरं पहिली, आमचं सामान वाहून नेणारी आणि निवांत गवत चरत बसलेली. त्यांना कॅमेरा मध्ये कॅप्चर करण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी माझी इच्छा पूर्ण केली
निवांत गवत चरत बसलेली खेचरं
 थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही परत चालायला सुरुवात केली. कॅम्प साईटच्याजवळ पोहोचल्यावर एक छोटीशी नदी क्रॉस करायची होती, मग सगळ्यांनी आपले बूट काढले, बॅग्सला बांधून टाकले आणि नदी ओलांडायला सुरुवात केली. पाण्यात पहिला पाय टाकल्यावरच ते किती थंड आहे ह्याची जाणीव झाली आणि पाय खरंच आहे की नाही ही पण जाणीव निघून गेली. गुडघ्या पर्यंत अतिथंड पाण्यातून आम्ही नदी ओलांडली आणि बाहेर आल्यावर थोडा वेळ एका जागी बसून घेतलं, मग थोड्या वेळाने आपल्याला पाय आहेत ह्याची जाणीव झाली. मग परत सगळे बूट घालून कॅम्प साईट च्या दिशेने चालू लागलो. थोड्याच वेळात सुमारे चार वाजता ज्वारा ह्या कॅम्प साईटच दर्शन झाले. भगव्या रंगाचे सुंदर तंबू टीमच्या लोकांनी आधीच उभारून ठेवले होते, ते मनमोहक निसर्ग सौन्दर्य पाहून, मला ते कॅमेरा मध्ये कॅप्चर करण्याचा मोह आवरला नाही
कॅम्प साईट: ज्वारा
 कॅम्प साईटवर पोहोचल्यावर मस्त सगळे गरम चहा पीत होते, मी पण पटकन चहाचा कप बॅगमधून काढला आणि चहा घेतला. एवढ्या गुलाबी थंडीत, धुक्यात, आणि डोंगरांच्या कुशीत चहा घेण्याचं सुख काही औरच होतं.  चहा झाल्यानंतर तन्मयने सगळ्यांना तंबू वाटून दिले, एका तंबूत तिघे जण राहणार असं ठरलं, मग मी, बरखा आणि रंजीतने एक तंबू; चैतन्य, मेघनाद आणि संकेतने एक तंबू घेतला. आम्ही तंबू मध्ये जाऊन जरा विसावलो आणि थोड्या वेळाने संध्याकाळी 6.30 वाजता मस्त गरम सूप प्यायलो आणि असच गप्पा मारत टाईमपास केला. मग "SJ"   ने सगळ्यांचे ऑक्सिजन रीडिंग्स घेतले आणि मग थोड्या वेळाने सगळे जण मस्त गरम जेवणावर तुटून पडले. एवढ्या डोंगरांच्या कुशीत, तुम्हाला जेवायला पोळी-भाजी, वरण भात, सॅलड आणि स्वीट्स मिळणं, ह्याचा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही. बाहेर खूप थंड वारे वाहत होते, तापमान पण 15-16°C होतं, त्यामुळे मला थोडासा ताप चढला, त्यामुळे मी फक्त जेवण टाळायचं नाही म्हणून थोडासा वरण भात खाल्ला आणि मग मी ट्रेक लिडला मला ताप आल्याचं जाऊन सांगितलं. त्याने रात्रीच्या जेवणानंतर एक क्रोसिन घ्यायला सांगितली आणि माझ्या ऑक्सिजन लेव्हल चेक केली, 92 रिडींग आलं, मिनिमम 80 रिडींग यावं लागतं, त्यामुळे माझ्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल व्यवस्थित होती. दिवस भराच्या थकव्यामुळे लगेच झोप लागली आणि स्लीपिंग बॅग्स मध्ये आम्ही निद्राधीन झालो

28June 2016: ज्वारा ते बालू का घेरा:12500 feet, 5 kms
सकाळी 7 वाजता आम्ही झोपेतून उठलो आणि त्यावेळी बाहेर हलकासा पाऊस पडत होता. तन्मयने आम्हाला नाश्ता च्या आधी स्लीपिंग बॅग कशी गुंडाळायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. मग आम्ही आपल्या स्लीपिंग बॅग्स गुंडाळून, तंबू मधलं कचरा साफ करून आवरून तयार झालो आणि नाश्ता उरकून पुढच्या प्रवासाला सज्ज झालो. पाऊस सुरूच होता, त्यामुळे सगळ्यांनी रेनकोट घातले आणि प्रवासाला सुरुवात केली. थोडेसे मोठे दगड, बर्फाचं वितळलेले वाहणारे पाणी आणि हिरवं गवत आणि त्या गवतात जांभळी, पिवळी आणि गुलाबी रंगाची छोटीशी फुलं असा रस्ता तुडवत आम्ही प्रवास सुरू केला. सुमारे दीड-दोन तास चालल्यावर सगळे जण एका ठिकाणी चहा साठी थांबलो, तिथे मस्त चहा घेऊन आणि थोडं फोटोसेशन करून आम्ही पुढचा रस्ता पकडला. रस्त्या मध्ये बऱ्याच ठिकाणी निंगोरचा खेळण्या साठीच जणू काही मोठे दगड मांडून ठेवले होते, त्यांचा फोटो काढून पुढची वाटचाल सुरू केली.  
निंगोरचा खेळ
माझा स्टॅमिना कमी पडतोय हे मला जाणवत होतं, जलद चालणारे खूप पुढे होते, सावकाश चालणारे -नेहा आणि अरविंद, ज्योती आणि राघवेन्द्र ही 2 जोडपी बरीच मागे होती. मी मात्र मधेच एकटी आपला प्रवास करत होते, तेव्हा एका मित्राने बोललेलं एक वाक्य आठवलं- "स्ट्रगल टू स्टॅन्ड अलोन अँड वॉक अलोन ". अशा प्रकारे डोक्यात खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत आणि आजू बाजूचं निसर्ग सौन्दर्य नाहाळात ट्रेकच्या कॅम्प साईट वर आम्ही दुपारी 2 वाजता पोहोचलो. येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवशी कॅम्प साईट लोकेशन अजूनच सुंदर दिसत होतं- आज ची जागा होती बालू का घेरा, तंबूच्या मागे आमचं लक्ष्य दिसत होतं- "hampta Pass" आणि तिकडे नेणारा रस्ता. आजचा प्रवास कमी असल्यामुळे दुपारचा जेवण कॅम्प साईटवर केलं. “SJ” आणि तन्मयने हिमालयात ट्रेक करताना काही नियम सांगितले होते. ट्रेकिंगच्या वेळी चढत असताना डोकं कायम कव्हर करायचं आणि कान मात्र उघडे ठेवायचे, कान हे सेन्सिंग पॉइंट्स असतात, ते मेंदूला कायम आपण उंची वर जात असल्याचा संदेश देतात आणि त्यामुळे आपला मेंदू उंचीवर कमी असलेल्या ऑक्सिजनच्या पातळी साठी तयार असतो. पण कॅम्प साईटवर गेल्यावर मात्र कान आणि डोकं दोन्ही कव्हर करायचे आणि शक्यतो पायात शूज ठेवायचे, जेणेकरून पायातून थंड हवा शरीरात जाणार नाही आणि आपण आजारी पडणार नाही. कॅम्प साईटवर गेल्यावर शक्यतो लगेच झोपायचं नाही, हा अजून एक नियम. आज ट्रेक लवकर संपल्यामुळे बराच वेळ शिल्लक होता, मग सगळेजण टाईमपास करत बसले, फोटो सेशन, ग्रुप फोटोज आणि बरीच दंगा मस्ती सगळ्यांनी केली. मग “SJ” ने आम्हाला ऑक्सिजन सिलिंडर कसा वापरायचा त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. नंतर तन्मयने एखाद्या व्यक्तीला आपत्कालीन परिस्थिती मध्ये उंचीवरून खाली कसा आणायचं ते दाखवलं. त्याने दोरीचा एक जाळं बनवलं आणि त्यामध्ये अजितला दोन पाय टाकायला सांगितले आणि त्याला अगदी सहज खांद्यावर घेतलं. त्यानंतर त्याने दोरीपासून स्ट्रेचर कशी बनवायची आणि एखाद्या व्यक्तीला खाली कसा आणायचं ते शिकवलं. बंगलोर ग्रुपमधल्या प्रीतिला त्याने त्या स्ट्रेचर वर झोपायला सांगितलं, त्यावेळी तिचा नवरा राजा ह्याचा चेहरा पाहण्या सारखा झाला होता आणि स्वरूप त्याला अजूनच चिडवत होता.अशा प्रकारची प्रात्यक्षिके झाल्यावर “SJ” ने एक खेळ खेळण्यासाठी सगळ्यांना एक गोल करून बसायला सांगितलं आणि त्याला जागा नाही म्हणून राघवेंद्र नागेशने आपल्या बाजूला जागा दिली. मग “SJ” ने खेळ सांगितला, तो म्हणाला की सगळ्यांना अजून एकमेकांची नावं माहीत नाहीयेत, म्हणून प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं आणि त्यापुढे एक विशेषण लावायचं. पुढच्याने आधीच्या व्यक्तीचं नाव सांगायचं, आता राघवेंद्र नागेश घाबरला की त्याला एकूण 27 लोकांची नाव लक्षात ठेवायची आहेत. असा हा खेळ सुरू झाला आणि आमची ही "स्पेशल छब्बीस" ची टीम तन्मय आणि “SJ” सोबत खेळ खेळण्यात मग्न झाली. सगळ्यांची नावं अशा प्रकारे होती:
 Rocking Sj, cool ajit, crazy suparva, confused anindo, happy monalisa, funloving rajiv, chilled raghavendra, VT jyoti, Sleepy megha, sarcastic rohini, observer shefali, exceptional tanamy, fainting rakesh, super swaroop, dashing raghu, Frozen Neha, adventurous arvind, Fastest shital, puzzled barkha, dead ranjeet, mesmerizing chaitanya, hungry meghanad, flamboy sanket, rabel ramshesh, lazy preethi, composed raja, jonty raghu आणि suman. 
अशा प्रकारे सगळ्यांशी छान ओळख झाली मग संध्याकाळी 6.30 वाजता सूप पिताना अजून गप्पा झाल्या आणि बंगलोर ग्रुपच्या लोकांशी माझी छान ओळख झाली. ट्रेक ग्रुपमध्ये प्रत्येकजण वेगळा होता, पण प्रत्येकाचं एका वैशिष्ठ्य होतं. त्यावेळी कळलं की "डॅशिंग रघु" ने दोन हिमालयन ट्रेक्स केलेत- केदारकंठ आणि हर की धून, हा त्याचा तिसरा ट्रेक होता, तो म्हणाला की पहिल्या ट्रेकला त्रास होतो, दुसऱ्या ट्रेकला सवय होते आणि तिसऱ्या ट्रेक पासून त्याचा आपण आनंद घ्यायला सुरुवात करतो, अगदिच खरं होतं ते. "जॉन्टी रघु" ने माझा "interview घ्यायला सुरुवात केली- कुठे जॉब करतेस, कशावर काम करते, कुठला सॉफ्टवेअर वापरते इत्यादी. त्याला हवी असलेली सगळी माहिती देत मी माझा सूप संपविलं. आणि मग मस्त जेवण झाल्यावर गाजराचा हलवा खाल्ला आणि निद्राधीन झालो

29June 2016: बालू का घेरा ते शिया गोरू- Hampta pass क्रॉस करून: 14100 feet at hampta पास to 11800 feet, 10.5 kms
सकाळी 5 वाजता उठून आम्ही आवरायला सुरुवात केली, आजच दिवस सगळ्यात कठीण होता, 8-9 तास चालायचं होतं आणि तेही 14100 फूट पर्यंत. 7 वाजता सगळे तयार झाले, किचन टीमने पॅक लंच सगळ्यांना दिले आणि आमची स्पेशल छब्बीसची टीम आज hampta pass क्रॉस करायला सज्ज झाली. आजच्या प्रवासात बरेच अवघड आणि धोकादायक पॅच असल्यामुळे, "SJ" ने टीमची रचना बदलली. जे हळू चालणारे आहेत त्यांना पुढे टाकलं आणि जोरात चालणाऱ्यांना शेवटी ठेवलं, जेणेकरून सगळे एकाच वेळी ट्रेक पूर्ण करतील. अशा प्रकारे आमचा ट्रेक सुरू झाला. जे मागे होते, त्यांना हळू चालायला बोअर होत होतं, पण इलाज नव्हता, त्यामुळे मागचे लोकं छान गाणी म्हणत, गप्पा मारत ट्रेकचा आनंद घेत होते. थोड्या वेळाने सगळे जण एका ठिकाणी पाणी प्यायला थांबले आणि "SJ" ने कोणाला काही त्रास होतोय का ते विचारलं. माझा थोडंसं डोकं दुखायला लागला होतं, मी त्याला तसं सांगितलं. त्याने पाण्यात इलेकट्रॉल पॉवडर टाकून पाणी प्यायला सांगितलं. अजून थोडंसं पुढे गेल्यावर मला अजूनच त्रास व्हायला लागला, डोकं प्रचंड दुखत होतं, चक्कर येतीये असा वाटत होतं, पण मी अगदी हळूहळू चालत राहिले. काही वेळ चालल्यानंतर पहिला बर्फाचा पॅच आला. मला होणार त्रास पाहून अजित माझ्या मागे चालत होता, त्याने माझी बॅग घेतली, जेणेकरून मी निवांत चालू शकेन. बर्फाच्या पहिल्या पॅच आधी मी थोडा वेळ बसून घेतलं, त्यावेळी आम्ही 13100 फूट वर होतो, माझं डोकं खूप दुखत होतं आणि मी कधी चक्कर येऊन पडेल ह्याचा नेम नव्हता, पोटात मळमळत होतं. "SJ" ने माझी ऑक्सिजन लेव्हल चेक केली, 80 च्या खाली होती ती, मग त्याने मला "Diamox " नावाची गोळी खायला दिली, जेणेकरून माझी शरीरातली ऑक्सिजन लेव्हल वाढेल, मग मी थोडंसं पाणी पिऊन परत चालायला सुरुवात केली. सगळे जण बर्फात छान खेळात होते, मस्ती करत होते, पण मला होणाऱ्या त्रासामुळे मी फक्त चालू शकत होते, तेवढीच ताकत माझ्या शरीरात उरली होती. मी मनाशी पक्का केलं होतं, काहीही झालं तरी चालेल, ट्रेक पूर्ण करायचाच, शरीराने साथ सोडली तरी मनाने आणि मेंदूने खचून जायचं नाही; काहीही झाला तरी परत माघारी जायचं नाही. असा निश्चय करून परत चालायला सुरुवात केली, दरवेळी तन्मय किंवा "SJ" माझ्या सोबतच होते, मला प्रोत्साहन देत होते, माझी मनशक्ती वाढवत होते. इथे मला बंगलोर ग्रुपमधल्या डॅशिंग रघु, जॉन्टी रघु, सुपर स्वरूप, फेंटिंग राकेश आणि रेबेल रामशेषने खूप मदत केली. जॉन्टी रघुच्या ड्रायफ्रुटसने मला जरा चढायला ताकत मिळाली, बाकीचे सगळे माझ्या नावाने "शितल शितल" म्हणून मला चिअरअप करत होते आणि ह्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे मी चालून शेवटी दुसरा बर्फाचा पॅच संपवला आणि 13700 फूट वर सगळे जेवायला थांबले. आता मात्र मला डोकेदुखी कंट्रोल करणं अशक्य झालं, डोकं फुटून मेंदू बाहेर येईल असा वाटत होतं, खायची इच्छा नव्हती. तरीही "SJ" ने जबरदस्ती थोडंसं खायला सांगितलं, 2 घास खाल्ल्यावरच जेवण जाईना, मग डबा बंद करून, शेंगदाण्याची चिक्की काढली खायला. "SJ" ने चिक्की पाहूनच त्यालाही आवडते असा सांगितलं, मग तन्मय पण आला, चिक्की वाटप करून आणि थोडीशी खाऊन मी पाणी प्यायले. मग जरा बरं वाटलं. परत थोडीशी विश्रांती घेतल्यावर सगळ्यांनी चालायला सुरुवात केली आणि तिसरा बर्फाचा पॅच लागला. तो क्रॉस करत आम्ही जवळजवळ आमच्या ध्येयापाशी पोहोचत आलो होतो. अजून थोडा वेळाने आम्ही "hampta pass" पाशी पोहोचलो. तन्मय आणि "SJ" प्रत्येकाशी हस्तांदोलन करून अभिनंदन करत होते. तिथे पोहोचल्यावर थोड्या वेळासाठी मी डोकेदुखी, चक्कर, पोटात मळमळणे ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेले, ट्रेकचा सर्वात उंच पॉईंट गाठल्याचा चेहऱ्यावर आनंद होता आणि मन समाधानी झालं होतं की आपण हार मानली नाही म्हणून. मग इंडिया हायीक्स चं पोस्टर हातात घेऊन आणि मोठ्याने ओरडून सगळ्यांनी एकच कल्ला केला आणि तन्मयने सेल्फी काढला, मग अनिंदो आणि रामने पण त्यांच्या कॅमेरा मध्ये फोटोज काढून घेतले. सगळ्यांचे फोटो सेशन झाल्यावर आम्ही तिथून खाली उतरायला निघालो. 
Hampta Pass ला पोहोचल्यावर जल्लोष करताना टीम
पास म्हणजे दोन डोंगरांना जोडणारा अरुंद रस्ता, तो क्रॉस करून आम्ही पुढे निघालो. आता पुढच्या प्रवासात खालीच उतरायचं होतं, त्यामुळे माझं त्रास थोडा कमी झाला. उतरताना बरखा मात्र घाबरली होती, तिने जो पुढे चालणार ट्रेक लिड होता- सुनील त्याचा हात पकडला आणि उतरायला सुरुवात केली. उतरताना मात्र जास्त तीव्र उताराचे आणि अवघड पॅचेस होते. सगळे जाणं एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ह्याप्रमाणे खाली उतरत होते. आता अजून एक बर्फाचा पॅच आला, त्यावरून घसरून खाली जायचं होतं, 70 फूट पेक्षा जास्त घसरून जायचं होतं, आणि खाली जोरदार प्रवाह असलेली नदी होती, त्यामुळे व्यायवस्थित घसरून जाऊन ब्रेक लावणं गरजेचं होतं. तन्मयने रवीला कसं घसरून जायचं, ह्याचं प्रात्यक्षिक द्यायला सांगितलं. मग आधी कोण जाणार ह्याचा निर्णय होईना, मी तडक दगडावरून उठले आणि म्हटलं मी जाणार सगळ्यात आधी. सगळेजण आश्चर्याने माझ्याकडे पाहायला लागले की थोड्या वेळापूर्वी ही मुलगी नीट चालू शकत नव्हती आणि आता सगळ्यात पहिल्यांदा बर्फावर घसरून खाली जाणार. तन्मयने ब्रेक कसे लावायचे ते सांगितलं आणि मला खाली सोडून दिलं बर्फावर घसरायला. अतिशय सुंदर आणि कायम लक्षात राहण्यासारखा अनुभव होता तो. मग एक एक करून सगळेजण खाली आले आणि थोड्याच वेळात आम्ही कॅम्प साईट वर पोहोचलो. माझं डोकं दुखायचं कमीच झालं नव्हतं, उलटी होईल असा वाटत होतं. बरखाने पाणी आणून दिलं आणि माझ्या सोबत थोडा वेळ थांबली. उलटी झाल्यावर मला जरा बरं वाटलं, थोडीशी चिक्की खाऊन आणि एक सॅरीडॉन गोळी घेऊन मी थोडावेळ झोपले. त्यावेळी बाकीचे लोक दम शराज हा खेळ खेळात होते, मी तो मिस केला ह्याचं मला खरंच अजूनही वाईट वाटतंय. नंतर मला बाकीच्या लोकांकडून खेळामध्ये किती दंगामस्ती केली ते कळलं. मग सगळ्यांचं खेळून झाल्यावर जेवण केलं आणि मस्त गरम गरम गुलाब जाम खाल्ले. थंडी बऱ्यापैकी होती, त्यामुळे सगळ्यांनी लवकर झोपुन घेतलं. दिवसा नयनरम्य वाटणारे बर्फाळ डोंगर आणि नदी रात्रीच्या वेळी तितकीच भयाण वाटते, हे रात्री लघु-कार्यक्रम करायला उठल्यावर कळलं. 

30June 2016: शिया गोरू ते चतृ: 11800 फूट ते 8000 फूट, 6 kms आणि चंद्रताल तलाव:
14000 फूट दुसऱ्या दिवशी निवांत सकाळी 6-7 च्या दरम्यान सगळे उठले, मग सगळेजण आवरून तयार झाले. SJ ला काही कामानिमित्त आजच ट्रेक सोडून मनालीला परत जावं लागलं. जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला, मला तर कुटुंब प्रमुखच ट्रेक अर्धवट सोडून निघून गेला असा वाटलं. त्याच्यासोबत फोटो काढून सगळ्यांनी त्याला निरोप दिला. समोरची नदी तो अगदी सहजतेने पार करून गेला आणि थोड्याच वेळात नजरेआड झाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत परत अजून एक ट्रेक SJ सोबत करायचं मनात ठरवून टाकलं. 
Rocking SJ सोबत काढलेला फोटो
आज समोरची नदी पार करायची होती, अति थंड पाणी आणि तेही गुडघ्यापर्यंत. तन्मयने सगळ्यांना हात पकडून साखळी करायला सांगितली आणि नदी पार करायला सुरुवात केली. पाण्यात पाय टाकल्यावर पाणी वाटलं होतं त्यापेक्षाही खूप थंड आहे ह्याची जाणीव झाली. जसं जसं पुढे जात होतो तसं पाण्याची पातळी आणि जोर वाढत होता, शेवटी एकमेकांचे हात धरून आम्ही नदी पार केली.
पाण्यातून बाहेर आल्यावर सुमारे 10-15 मिनिटे पाय आहेत ही जाणीवच होत नव्हती. गवतावर आम्ही सगळे कांगारूसारख्या उड्या मारत होतो आणि शरीरात ऊब निर्माण करत होतो. मग सगळ्यांनी शूज घातले आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. 

नदी क्रॉस करताना अनिंदोने काढलेला फोटो
आजचा प्रवास पण पूर्ण उतारच होता. यामुळे बरखा रंजीत किंवा सुनीलचा हात पकडूनच खाली उतरत होती. मी तर छान रस्त्यात फोटोज काढत, समोरचे डोंगर, नदी ह्यांचं निसर्गसौन्दर्य मनात साठवत आरामात चालले होते. सुमारे 2 तासानंतर आम्हाला चतृचा रस्ता दिसला आणि कॅम्प साईट दिसली, पण अजून बराच चालायचं होतं आणि खाली उतरायचं पण होतं. एका ठिकाणी सगळ्यांनी थोडीशी विश्रांती घेऊन आणि ग्रुप फोटोज काढून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
आज ऊन पण होतं त्यामुळे जरा चालायला त्रास होत होता आणि पाणी पटापट संपत होतं. असा हा प्रवास करत सगळे सुमारे दुपारी 1 वाजता कॅम्प साईटवर पोहोचले आणि सगळ्यांनी जेवण केलं. दुपारी दोन वाजता गरजेचं सामान घेऊन सगळे चंद्रताल तलाव पाहण्यासाठी जायला निघालो आणि टाटा सुमोमध्ये बसलो. जो रस्ता आम्हाला वरून चांगला वाटत होता, त्यावरून जाताना कळलं की रस्ता म्हणजे गाड्या जाऊन तयार झालेला दगड आणि खड्ड्यांमधला रस्ता. थोड्याच वेळात एक गाडी बंद पडली, त्यामुळे एक तास थांबावं लागलं. पुढे बसलेला स्वरूप आमच्या सोबत कदाचित बोअर झाला आणि परत पुढच्या गाडीत जाऊन डॅशिंग रघुसोबत बसला. बाकीच्या लोकांनी फोटो सेशन केलं.गाडी शेवटी सुरू झाली आणि आम्ही निघालो. रस्त्यात खड्डे आणि दगड आहेत की दगंडामधून जाणारा रस्ता आहे हेच कळत नव्हतं. 70 किलोमीटरच्या अशा खडतर प्रवासानंतर आम्ही 5 वाजता चंद्रताल तलावाजवळ पोहोचलो. तलाव 10 मिनिटावर आहे असा सांगण्यात आलं, पण तो सुमारे 30-40 मिनिटांवर होता आणि 14000 फुटावर असल्यामुळे सगळेच हळू चालत होते. मला परत डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि मग मी तन्मयला बोलावून घेतलं, त्याने एक क्रोसिन गोळी दिली आणि मला जरा बरं वाटलं. त्याने विचारलं की तलाव पाहायचा की नाही, मी परत मनाशी ठरवलं की एवढया लांब आलो आहोत तर तलाव नक्कीच पाहायचाय आणि तन्मयचा हात पकडून चालायला सुरुवात केली. वाटेत chilled राघवेंद्र ना "Perk" चा तुकडा खायला दिला आणि त्याने मला जरा बरं वाटलं. जिथून तलाव नीट दिसत होता, तिथे गेलो तेव्हा प्रीति आणि राजा तिथे उभे होते. बाकीचे सगळे खाली उतरून तलावाजवळ मस्ती करत होते. मग प्रीतिने माझा कॅमेरा घेतला आणि माझा हात पकडून मला खाली घेऊन गेली. अगदी मोठ्या बहिणीसारखी तिने माझी काळजी घेतली. ट्रेकमध्ये 2 दिवसापूर्वी ओळख झालेली लोकही इतकी प्रेमाने वागतात हे पाहून, मनाला खूप बरं वाटलं. तलावाजवळ गेल्यावर ग्रुप फोटोज काढून आणि थोडा वेळ तिथे टाईमपास करून आम्ही निघालो. ह्या तलावाचा आकार वरून पाहिल्यावर चंद्रासारखा दिसतो, म्हणून याचा नावं चंद्रताल आहे हे कळलं आणि ऊन असेल तेव्हा आजूबाजूच्या डोंगराचं छान प्रतिबिंब त्याच्या पाण्यात पडतं, त्यामुळे तो अजूनच सुरेख दिसतो. पण आम्हाला तो नजारा काही पाहायला मिळाला नाही कारण सूर्यास्त होऊन गेला होता. चंद्रताल तलावाच्या सुंदर आठवणी मनात साठवत आम्ही तिथून निघालो. 
रामने काढलेला चंद्रताल तलावाचा सुंदर फोटो

रामने काढलेला चंद्रताल तलावाचा सुंदर फोटो

चंद्रताल तलावावर काढलेला टीमचा फोटो 
 वाटेत जाताना परत अगदी नको म्हणत असतानाही प्रीतिने माझा कॅमेरा तिच्याकडे घेतला आणि डॅशिंग रघुने पाणी प्यायला दिलं. तिथून निघाल्यावर सगळ्यांनाच खूप भूक लागली होती, कारण संध्याकाळचे 7 वाजले होते आणि जेवण करून सुमारे 6 तास होऊन गेले होते. मग एका ठिकाणी थांबून सगळ्यांनी चहा, मॅगी, ब्रेड-ऑम्लेट यावर छान ताव मारला आणि रात्री 10.15 ला आम्ही चतृला परत पोहोचलो. सगळ्यांनी लगेच पटकन जेवण करायला घेतलं, बरखा आणि रंजीतला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे ते दोघे तंबूमध्येच जेवले. मी आणि चैतन्य डायनिंग टेन्टमध्ये जेवायला गेलो. तेव्हा स्वरूपने मला बसायला जागा दिली आणि परत बंगलोर ग्रुपसोबत जनरल गप्पा झाल्या. आज "राधे" ह्या एका किचन टीम मेंबर्चा वाढदिवस होता. त्यामुळे किचन टीमने छान केक बनवला होता, तो कट करून राधेचा वाढदिवस साजरा केला आणि मस्त केक खाल्ला. जेवण झाल्यावर आज झालेल्या खडतर प्रवासामुळे सगळेच पटकन झोपी गेले. 

1st July 2016: चतृ ते मनाली प्रवास:
आज शेवटचा दिवस उजाडला आणि सकाळी 5 वाजताच जाग आली. सकाळची आन्हिकं उरकून झाल्यावर सगळेजण गप्पा मारत होते. थोड्याच वेळात तन्मयने सगळ्यांना गोल करून उभं राहायला सांगितलं आणि ट्रेक पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र वाटप केलं. त्यानंतर इकोबॅग्स मध्ये ज्यांनी सगळ्यात जास्त प्लॅस्टिक कचरा जमा केला त्यांना पण मानचिन्ह देण्यात आलं, ते स्वरूप, राजा आणि राकेशला मिळालं. त्यानंतर ग्रुप सोबत फोटो सेशन करून आम्ही मनालीच्या दिशेने रवाना झालो. 

ट्रेक पूर्ण झाल्याच्या आनंदात जल्लोष करताना टीम

Banglore group

Banglore group

अशा प्रकारे हिमालय ट्रेकचा एक नवीन अनुभव घेऊन, खूप सारे नवीन मित्र-मैत्रिणीं जोडून, पुन्हा परत एकत्र ट्रेक करायचा असं ठरवून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला; अर्थात पुन्हा भेटण्यासाठी, नवीन आठवणी बनवण्यासाठी, नवीन जागी ट्रेकला पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि असा बरंच काही नवीन करण्यासाठी.
मनालीला जाताना आम्ही रोहतांग पास वरून आलो, तेव्हा बाहेरचा नयनरम्य देखावा खूपच सुंदर होता. त्याचा हा एक फोटो:
रोहतांग पासचा घाट
रोहतांग पासला रस्त्यात लागलेलं मंदिर
मनाली बस स्टॅन्ड वर आम्ही सगळे परत एकत्र भेटलो आणि "SJ" तिथे आम्हाला भेटायला आला. त्याला भेटून आणि जनरल गप्पा मारून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

असा झाला माझा पहिला हिमालय ट्रेक, नवीन आणि अनोळखी लोकांसोबत पाहिल्यान्दा मी ट्रेक केला आणि स्वतःला दिलेला एक आव्हान पूर्ण केलं. तसंच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेलाही आव्हान दिलं होतं तेहि पूर्ण केलं. आता माझी वारंवार हिमालयन ट्रेक्स करण्याची इच्छाशक्ती अजूनच वाढलीये आणि मी दर सहा महिन्यातून किंवा वर्षातून एक तरी हिमालयन ट्रेक करायचं मनाशीच ठरवलंय.
निहाल कॉटेज समोरचं टुमदार घर